अक्षय तृतीया 2023
नमस्कार 🙏
अक्षय तृतीयेला दिवस उजाडला आणि चित्पावन परिवार कोथरूड ची सर्व सभासद मंडळी कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात होती त्यासाठी संध्याकाळ होताच सर्वाची पाऊले उत्सव सभागृह कडे वळली. सर्व जण पारंपारिक वेशात नटूनथटून आले होते.कोअर कमिटी सभासद सुद्धा आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत उत्सव सभागृहात नटूनथटून जमले होते.परशुराम जन्म दिवस साजरा करण्यासाठी सर्व जण उत्साहात होते
दीपाली आणि अनिल जोशी यानी पुजेची यथासंग तयारी केली होतीच
चित्पावन परिवार कोथरूड आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्वाचेच स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावरच शीतल व तनीशा बापट महिलांना हळदीकुंकू अत्तर व पुरूषांना गंधाचे नाम लावण्यासाठी सज्ज होत्या.
भगवान परशुराम पूजन मायाताई व माधव आघारकर या दांपत्याने केले. पूजेचे पौरोहित्य लघाटे गुरूजी यांच्याकडे होते. त्यानंतर आरती व ब्रम्हवृंदांच्या मंत्रजागराने वातावरण एकदम प्रसन्न झाले.
अनिल खाडिलकर,रवी जोशी,शरद बापट व संयोगिता जोशी यांच्या शंखनादाने आरतीच्या वेळेस एक सकारात्मक उर्जा निर्माण होऊन वातावरण भारून गेले. पुणेरी पगडी, उपरणे व झब्बा पायजमा अशा पारंपारिक वेशात शंखवादक आले होते.आरतीला पराग जोशी यांची समर्पक तबला साथ होती.
यानंतर प्रसादाचा पेढा व देसाईबंधूकडून आलेले स्वादिष्ट बटाटावडा , शिरा व काॅफी झाल्यावर सर्व मंडळी पुढील कार्यक्रमासाठी स्थानापन्न झाली.
अनिल फड़के यानी प्रसाद सर्वाना मिळाला की नाही याची जातीने दखल घेतली
आपले सण व उत्सव परंपरा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम मायाताई आघारकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला व त्यांनीच मेहनत घेऊन सूत्रसंचालन केलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. मायाताई आघारकर, शीतल बापट व नेहा घारे यांच्या टीमने हा कार्यक्रम उत्तम होण्यास खूप मेहनत घेतली होती.
चैत्र ते फाल्गुन महिन्यात येणारे सण वार व परंपरा असे याचे स्वरूप होते.
सुरवात अनिल खाडिलकर यांनी शंखनाद व त्याचे महत्त्व विशद करून शंखनादाचे फायदे यावर विस्तृत विवेचन केले.
चैत्र गौर यावर सुचेताताई बापट यानी छान पद्धतीने माहिती सांगितली. आपली सजावटीची वैशिष्ट्य त्यानी विशद करून सर्व उपस्थितांची वाहवा मिळवली.
त्यानंतर श्रावण महिन्यात होणारी श्रावणी म्हणजे काय इथपासून ती का करावी याची उत्तम माहिती शरद बापट यानी सादर केली सर्व माहिती विद्याधर पाटणकर गुरूजी यांच्याकडून संकलित करण्यात आली होती..
मंगळागौर या विषयावर माधवी केतकर यांनी अतिशय सुंदर आवाजात गाणी म्हणत मंगळागौरीची प्रथा व खेळ याचे निवेदन केले.
नंतर येतात गौरी गणपती.आपल्या चित्पावनांच्यात गौरी या खड्याच्या असतात त्याची वैशिष्ट्ये व माहेरवाशीण गौरी पाणवठ्यावर जाऊन आणते व पूजन ह्यावर अतिशय उत्तम माहिती अंजलीताई बापट यांनी दिली
त्यानंतर नवरात्र व चित्पावनांचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टमीचे महालक्ष्मी पूजन.
सौरभ मराठे या आपल्या तरुण सभासद व कलाकाराने देवीचा मुखवटा कसा बनवतात त्याची उदाहरणे देत माहिती दिली.तो या विषयात तज्ञ असून अनेक ठिकाणाहून त्याला मुखवटे काढण्यासाठी निमंत्रण असते.
देवदिवाळी त्याचे वैशिष्ट्य व नैवेद्य यावर मायाताई यानी निवेदनातून छान माहिती दिली.
नंतर होळी निमित्त कोकणातील पालखी व खेळे /नमन या विषयावर आमचे उत्साही सभासद सानेकाका यानी फारच छान माहीती सांगितली.
बोडण ही आपल्या चित्पावनांची एक परंपरा व खासियत. त्यावर अंजलीताई व सुचेताताई बापट यांनी मुलाखत स्वरूपात उत्तम सादरीकरण केले. तसेच कालानुरूप बदल कसे करावेत असे छान पद्धतीने सांगितले.
नंतर आमचे अजून एक तरूण सभासद सागर बर्वे यानी वर्षांत एकंदर नऊ नवरात्र असतात व त्याची थोडक्यात पण अभ्यासपूर्ण व उपयुक्त माहिती दिली.
छाया ठोसर यांच्या सुरेल महालक्ष्मी च्या भजनाने आणि संध्याताई जोशी यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व सभासद एक नाविन्यपूर्ण व माहितीपूर्ण कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल समाधान व्यक्त करत सभागृहाबाहेर पडले.
राहुल बापट आणि उमेश पोंक्षे यांनी सर्व कुपन वाटप व रिन्युअल व देणगी रिसीट बनवणे हे एकहाती सांभाळले.
सर्व कोअर कमिटी सभासदांच्या मेहनतीतून कार्यक्रम आयोजित होऊ शकला व उत्तम झाला. रवी जोशी यांनी नेहमीप्रमाणेच उत्तम फोटो काढल्यामुळे कार्यक्रम न आलेल्या सभासदापर्यत पोचला.
पुढील कार्यक्रम जाहीर झाल्यावर लगेच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.
चित्पावन एकत्रीकरण च्या आमच्या प्रयत्नांना आपले ओळखीचे व नातेवाईक याना सभासद करून घेऊन हातभार लावावा.
धन्यवाद.
चित्पावन परिवार कोथरूड कार्यकारिणी समिती.