काॅर्पोरेट कीर्तन
नमस्कार 🙏
समर्थ भक्त समीर लिमये यांचे काॅर्पोरेट कीर्तन हा कार्यक्रम करायचे ठरले आणि नेहमीप्रमाणेच चित्पावन व्हाॅटसअप कट्ट्यावर कार्यक्रम जाहीर झाल्यावर नाव नोंदणी सुरू झाली. सर्व सभासदांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळेच कार्यकारिणी सभासद सुद्धा उत्साहाने तयारीला लागले.
२६ फेब्रुवारी २०२३ रविवार संध्याकाळी ६ वाजता काॅफी घेऊन उत्सव सभागृह कोथरूड येथे सर्व जण वेळेत स्थानापन्न झाले. नेहमीच्या प्रथेनुसार कार्यकारिणी सभासद व समीरजी लिमये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर रवीजी जोशी यांच्या शंखवादनानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली.
खणखणीत आवाजात जय जय रघुवीर समर्थ म्हणत समीरजी नी जी सुरवात केली ती पुढील सव्वा दोन तास आपल्या ओघवत्या वाणीतून समर्थाचे विचार उलगडून सांगताना दासबोध व मनाचे श्लोक याचा आधुनिक काळात काॅर्पोरेट जगताशी कसा संबंध जोडला जाऊ शकतो हे उदाहरणांसह व पाॅवरपाॅइंट प्रेझेंटेशन द्वारे उत्तम रित्या मांडले आणि ते विचार उपस्थित श्रोत्यांच्या काळजाला जाऊन भिडले. एका वेगळ्याच धाटणीचे कीर्तन ऐकायला व पहायला मिळाल्याचे समाधान मिळाले.
आज आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे विचार पोचणे किती महत्वाचे आहे हे लक्षात आले.समर्थ साहित्य याचा प्रचार व प्रसार पूर्ण वेळ करण्यासाठीच इंजिनियर असलेल्या समीरजीनी आपला नेहमीचा व्यवसाय बाजूला ठेवला.
खरोखर सव्वादोन तास मंत्रमुग्ध होऊन श्रोते घरी परतले ते समर्थांची विचारधारा घेऊनच.
समीरजी लिमये यांना उत्तम आरोग्य व त्यांच्या कार्यात यश मिळू दे अशी त्या समर्थांकडेच प्रार्थना.
धन्यवाद. 🙏